जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती

 118 जणांची निवड; आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम 

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रण सक्षम करण्यासाठी आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 118 उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बीएएमएस वैद्यकीय अधिकारी आणि बीएस्सी नर्सचा समावेश आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे उपकेंद्रात रुग्णाची तपासणी, उपचार यासह लसीकरण मोहिम त्वरीत राबवणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यात 67 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांच्याअंतर्गत 378 उपकेंद्र आहेत. रत्नागिरीचे भौगोलिक क्षेत्र प्रतिकुल असल्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा राबवणे अशक्य होते. डोंगराळ भाग असल्याने गावाच्या एका बाजूला असलेल्या लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोचवणे शक्य होत नाही. उपकेंद्रांच्या माध्यमातून तसा प्रयत्न सुरु आहे. परंतु या उपकेंद्रात आरोग्य सेवक, सेविकांची नियुक्ती असल्यामुळे रुग्णाची तपासणी व औषधोपचार करता येत नव्हता. प्राथमिक तपासणीसाठी आरोग्य केंद्रांचाच आधार घ्यावा लागत होता. काहीवेळा गंभीर आजार किंव साथींचे रोग उद्भवलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार होत नाही. काहीवेळा रुग्णाच्या जीवावर बेतणारी परिस्थिती निर्माण होते. आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत राज्यातील उपकेंद्र सक्षमीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. उपकेंद्रांमध्ये तपासणी झाली तर साथरोगांवर वेळीच नियंत्रण ठेवणे शक्य होईल या उद्देशाने बीएएमएस व बीएस्सी नर्सची नेमणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणीही झाली आहे.

राज्य शासनकाडून या साठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले होते. त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या नेमणुकीसाठी मंगळवारी (ता. 8) समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर उपस्थित होते. रत्नागिरीतील नऊ तालुक्यांमध्ये प्रत्येकी तेरा जणांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीएएमएस वैद्यकीय अधिकारी आणि बीएस्सी नर्स असल्यामुळे वेळेत उपचार करता येणार आहेत. सामान्य व्यक्तीसाठी उपकेंद्रांचे सक्षमीकरण फायदेशीर ठरु शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुक्यात नेमलेल्या या समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना बाह्यरुग्ण तपासणी करणे, कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी भेटी देणे, त्या-त्या दिवशीच्या कामकाजाचा अहवाल सॉफ्टवेअरमध्ये भरणे ही कामे करावयाची आहेत. तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्‍या अभियानांची अंमलबजावणीत सहकार्य करावयाचे आहे.