रत्नागिरी:- नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या जिल्ह्यातील चिपळूण, खेड व अन्य तालु्क्यांच्या मदतीला आता शेकडो हात पुढे येणार आहेत. आपदा मित्र व सखी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ३०० प्रशिक्षित मित्र प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आपत्तीवेळी धावून येणार आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामार्फत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३०० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. २०० जणांच्या नावाची नोंदणी झाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याला दुजोरा दिला. गेल्या कोकण आणि इतर काही जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठी वित्त व जीवितहानी झाली होती. हवामानखात्यानेही चक्रावादळासह विविध नैसर्गिक आपत्तीच्या घटना वारंवार घडत राहणार असल्याचा इशारा दिला आहे. भविष्यात नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक सक्षम आणि भक्कम करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनकडून यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी बैठक घेण्यात आली. या वेळी प्रमुख्याने आपत्तीच्यावेळी मुष्यबळ कमी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यावर उपाय काढण्यासाठी शासनाने भविष्यात मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी आपदा मित्र आणि सखी या मित्रांना घेण्याचा निर्णय झाला. हे उमेदवारांना केवळ नैसर्गिक आपत्तीवेळी बोलावण्यात येणार आहे. ज्यांना सामाजिक कामांची आवड आहे, मदतीसाठी धावून येऊ शकतात, अशांची निवड करण्यात आली आहे.यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना स्वतंत्र ड्रेसकोड, इतर शासकीय यंत्रणा दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आता शासनानेच हात आणखी बळकट होणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यावर काम करीत आहेत.









