रत्नागिरी:- उत्तरेकडील राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही थंडीने आपला जोर चांगलाच वाढवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली असून गुरुवार हा दिवस यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या लाटेमुळे तापमानात घट नोंदवली गेली आहे. जिल्ह्यात तापमान 15 ते 17 डिग्री अशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भाग एक अंकी किमान तापमानात नोंदले गेले.
हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींचा थेट परिणाम आता महाराष्ट्रावर स्पष्टपणे दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पारा 6 ते 7 अंशांदरम्यान स्थिरावला आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभाग आणि राज्यातील हवामान निरीक्षण यंत्रणांच्या माहितीनुसार, पुढील 36 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. यामुळे मध्य महाराष्ट्रासह कोकणातही किमान तापमानाचा म्हणजेच ‘हाडं गोठवणाऱ्या थंडीचा‘ यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील दोन दिवसांत थंडीच्या लाटेचा इशारा राज्यातील अनेक जिल्हय़ांना देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील घाट क्षेत्रांमध्येही घोंगावणाऱ्या शीतलहरींमुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागांवर धुक्याचे साम्राज्य असल्याने दृश्यमानतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी (11 डिसेंबर) किमान तापमानात 17 डिग्री अंश सेल्सियसपर्यंत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या घसरलेल्या तापमानामुळे जिल्ह्य़ातील शहरी भागांसह ग्रामीण भागात गारठा वाढल्याची अनुभूती नागरिकांनी घेतली. सकाळच्या वेळेस बोरे थंडगार वारे आणि अनेक भागात धुक्याची हलकी चादर अशी हिवाळ्याचा अनुभव देत आहे.
यंदाच्या वर्षात जवळपास सहा महिने लांबलेला पावसाळा आणि यादरम्यान थंड वातावरणामुळे पावसाळा आणि हिवाळा एकच वेळ जाणवत होता. ऐन दिवाळीत पाऊस सुरू होता. त्यानंतर पाऊस नसला तरी वातावरणात गारवा नव्हता. नोव्हेंबर महिन्यात खऱया हिवाळ्याला सुरुवात झाली. महिन्याच्या मध्यात चांगली थंडी जाणवली होती. नंतर तापमानात वाढ दिसून आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवते आहे. या आठवडय़ात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सोमवारपासूनच थंडी जाणवू लागली. गुरुवारीही तापमानात मोठी घट नोंदवली गेली.
जिल्ह्यात 19 डिसेंबरपर्यंत हवामान विभागा थंडा अंदाज (किमान तापमान):
-आज दि.12 व दि.13, 14 डिसेंबर रोजी 17 डिग्री सेल्सियस.
-दि.15, 16 डिसेंबर रोजी 18 डिग्री सेल्सियस.
-दि. 17, 18 डिसेंबर रोजी 20 डिग्री सेल्सियस.
-दि. 19 डिसेंबर रोजी 19 डिग्री सेल्सियस.









