रत्नागिरी:- जिल्ह्यात सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्या दोन तासांत मतदारांचा उत्साह अपेक्षेप्रमाणे दिसून आला नाही. दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ ४०.१५ टक्के मतदानाची नोंद झाली. अनेक मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बिघाड झाल्याने रांगा लागल्या आणि मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू राहिली.
चिपळूण तालुक्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर होती. येथील तब्बल ४५ मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. खेर्डी गटातील चार ते पाच केंद्रांवर मतदान यंत्रे ठप्प झाली होती. याशिवाय शिरगाव, सावर्डे कॉलनी, पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते, पेढांबे, पिंपळी, सती-चिंचघरी, कळवंडे आणि मालघर या गावांमध्येही यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे मतदान तासन्तास रखडले.
केवळ चिपळूणच नव्हे, तर दापोली तालुक्यातील उटंबर आणि खेड तालुक्यातील बोरज येथेही मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. पर्यायी यंत्रणा वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे काही मतदारांनी केंद्रावरून माघार घेतल्याचेही चित्र दिसून आले. यंत्रे बंद पडल्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांमध्ये नाराजी पसरली. “सकाळची वेळ कामाची असते. तासभर रांगेत उभे राहूनही मशीन चालत नसेल, तर किती वेळ थांबायचे?” असा सवाल संतप्त मतदारांनी केला.
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गणातही मतदान यंत्र बिघडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सकाळी तपासणी करूनही तासाभरात मशीन बंद कशी पडते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकारी जिंदल यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक विभागाने तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले आहे. मतदारांनी शांतता राखून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









