जिल्ह्यात अडीच लाख जणांना मिळाला दुसरा डोस

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर १८ वर्षांवरील लसीकरण मोहीम जास्तीत जास्त वेगाने राबविण्यावर भर दिला आहेत. उपलब्ध होणार्‍या मात्रांचा पुरेपूर वापर करुन ग्रामीण भागात त्याचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत ११ लाख २४ हजार ९२८ पैकी ८ लाख ४४ हजार ९३८ जणांना लस दिली. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या २ लाख ५० हजार ७९६ आहे. येत्या दोन दिवसात जिल्ह्याला २५ हजार डोस मिळणार आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून नियोजन सुरु झाले आहे.

 कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातून कमी होत असला तरीही अजुनही पन्नास ते शंभरच्या दरम्यान बाधित सापडत आहेत. सुरक्षिततेसाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन या दोन लसीच्या मात्रा दिल्या जात आहेत. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासहसुमारे शंभरहून अधिक केंद्र निश्‍चित केली आहेत. जिल्ह्याला आठवड्यातून दोनवेळा लसीच्या मात्रा मिळतात. आरोग्य विभाग उपलब्ध साठ्यानुसार प्रत्येक केंद्रात लस देत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून याचे नियोजन केले जाते. डोस आल्यानंतर आरोग्य केंद्रामार्फत गावागावात त्याची माहिती पुरवली जाते. काही ठिकाणी ऑनलाईन नोंदणीसाठी रेंज नसल्याने ऑफलाईनचा पर्याय निवडावा लागतो. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लसीकरणासाठी पुढाकार घेऊन जादाचे डोस रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरातील बहुतांश लोकांचे पहिले डोस पूर्ण होत आले आहेत.
जिल्ह्यात १८ वर्षांवरील ११ लाख २४ हजार ९२८ जणांना लस द्यावयाची आहे. आतापर्यंत पहिला डोस ५ लाख ९४ हजार १४२ जणांनी घेतला असून हा टक्का ५२.८९ टक्के तर २ लाख ५० हजार ७९६ जणांनी दुसरा डोस घेतला असून हा टक्का २२.२९ आहे. कोव्हॅक्सीनपेक्षा कोविशिल्ड घेतलेल्यांची संख्या ६ लाख ६३ हजार ४७४ आहे. दुसरा डोस घेतलेले नागरिक पूर्णतः सुरक्षित झाले आहेत. जिल्हा बाहेरील प्रवास यासह मॉलमध्ये फिरण्यास परवानगी मिळत आहे.