धनंजय कुलकर्णी ; 15 दिवसात पाळेमुळे खणून काढण्यासाठी पावले
रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या ४ टोळ्या आहेत. या गॅंगच्या माध्यमातून अंमली पदार्थांची वितरण होत असल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. तस्करीमध्ये गुंतलेल्या या टोळ्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी 15 दिवसांमध्ये योग्य ती वेगवान पावले उचलली जातील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. वेळोवेळी त्या विक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई देखील केलेली आहे. त्यामध्ये अनेक संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत. नुकतीच रत्नागिरी रेल्वेस्थानकावर देखील हेरॉईन या अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे या वारंवार घटना समोर येत असल्याने त्या पदार्थांच्या तस्करीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत. वारंवार कारवाई करून देखील या अंमली पदार्थाच्या तस्करीला प्रतिबंध होताना दिसत नाही. परजिल्ह्यातून, परराज्यातून अंमली पदार्थ रत्नागिरीत येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांनी हे प्रकार रोखण्यासाठी तपासचक्रे गतीमान केली आहेत. त्या दरम्यान या ठिकाणी वेगवेगळ्या गँग कार्यरत असल्याची बाब तपासाच्या रडारवर आली आहे.
जिल्ह्यात चार गॅंग आहेत. ते अंमली पदार्थांची तस्करी करून अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये लांजा, देवरूख, चिपळूण, रत्नागिरी, खेड येथे यापूर्वीच कारवाई झाली आहे. बारसूतील बंदोबस्तातून आम्ही आता मोकळे झालो. आता येत्या 15 दिवसांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळींची पाळेमुळे खणून काढू, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.









