जिल्ह्यातून निर्यात चौपट करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ 

युरोपीय बाजारपेठांसह नवीन बाजारपेठांवर लक्ष 

रत्नागिरी:- आंबा, काजू, कोकम आणि मत्स्य प्रक्रिया पदार्थांची जिल्ह्यातून होणारी निर्यात चौपट करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार झाला आहे. यामध्ये युरोपीय देशांसह नवीन बाजारपेठा लक्ष्य करतानाच निर्यातीला आवश्यक परवानग्या जिल्ह्यातच मिळवून दिल्या जातील. तसेच समुद्र मार्गे वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्हा आराखड्यात निर्यातविषयक परवानगी जिल्हा स्तरावर त्वरित मिळावी यासाठी एक खिडकी योजना, प्रशिक्षण केंद्र, जीआय प्राप्त उत्पादनांचा प्रसार करणारी यंत्रणा, खरेदीदार असलेली नवनवीन बाजारांची माहिती, सीइटीपी सारखे प्रदुषण नियंत्रण प्लांट, तपासणी प्रयोगशाळा, मासे निर्यातसाठी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. तिन टप्प्यात अंमलबावणी होणार्‍या आराखड्यात २ ते ५ वर्षांच्या टप्प्यात फ्राईड कॉरिडोअरची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरीतील जयगड, मिरकरवाडा बंदरांमधून न्हावाशेवासारख्या मोठ्या बंदरापर्यंत माल नेऊन तेथून निर्यातीचा प्रस्ताव आहे.
जिल्ह्यातून गतवर्षी ४३ कोटी ४८ लाख आंबा, १५९ कोटी रुपयांचा आंबा प्रक्रिया पदार्थ, वेंगुर्ला काजू बी ८ कोटी ४८ लाख, काजू प्रक्रिया पदार्थाचे २१ कोटी ८८ लाख, कोकम ३९ लाख आणि मत्स्य प्रक्रिय पदार्थाची सुमारे पावणीतीन हजार कोटीची निर्यात झाली. माशांची निर्यात रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागरमधून होते. निर्यात वाढविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर त्यात चौपट वाढ होईल अशी अपेक्षा आहे. मत्स्य निर्यातदारांसह आंबा, काजू, कोकम निर्यातीसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात  येणार आहे. बाहेर जाणाऱ्या मालावर रत्नागिरीतच प्रक्रिया करण्यावर आराखड्यात भर दिला गेला आहे.हापूसची मागणी असलेल्या नेपाळ, बांग्लादेश, चिन, युरोपीअन देश, नेदरलॅण्ड, जर्मनी, व्हिएतनाम, फ्रान्स, स्पेन, हॉगकाँग सारखी नवीन देशांमधील बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत.