खासदार विनायक राऊत यांची माहिती
रत्नागिरी:- जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे भुस्खलनाचे प्रकार वाढले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात ८१ गावांमधील अनेक वाड्यांमधील लोकांचा शंभर टक्के पुर्नवसनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. यामध्ये तिवरेचाही समावेश आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीनंतर केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत सांगितले. जुलै महिन्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. चिपळूण, खेड शहर जलमय झाले होते. या व्यतिरिक्त सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणार्या लोकवस्त्यांमध्ये दरडी कोसळून माती शिरली होती. चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात हे प्रकार सर्वाधिक झाले आहेत. दोन वर्षांपुर्वी तिवरे धरण फुटून जीवीतहानी झाली होती. यंदा सुदैवाने तिवरे गावातच दोन वाड्यांच्या मधोमध दरड कोसळली. पोसरेत सात कुटूंबे गाडली गेली. गेले काही दिवस दरडग्रस्त भागांचा खासदार राऊत यांनी दौरा केला होता. लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रत्नागिरीत पत्रकारांनी बोलताना ते म्हणाले, भुस्खलनाचे प्रकार वाढल्यामुळे डोंगराजवळ असलेल्या कुटूंबांमध्ये भितीची छाया आहे. मुसळधार पावसामध्ये अजुनही डोंगर खचत आहेत. तेथील लोकांचे शंभर टक्के पुर्नवस करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने यांनी आढावा घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रस्ताव तयार केला जाणार आहे. तो राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल. भुगर्भ तंज्ज्ञामार्फत दरडग्रस्त भागांचा अभ्यास करण्यात येईल. त्यामध्ये तिवरे ग्रामस्थांच्या पुर्नवसनाचाही समावेश केला जाणार आहे.