1 लाख विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक
रत्नागिरी:-कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा दीड वर्षांनंतर सुरू होत आहेत. जिल्ह्यात 5 ते 12 वीच्या 454 शाळा असून त्यात एक लाख 2 हजार विद्यार्थी आहेत. शाळा सुरु करण्यासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुचना देण्यात आल्या आहेत; मात्र शाळा सुरु करण्यापुर्वीच्या तयारीसाठीचा निधी उभारण्याची चिंता मुख्याध्यापकांपुढे आहे. त्यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याचा पर्याय अवलंबावा लागणार आहे.
दुसर्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्य शासनाने कोरोना प्रतिबंध क्षेत्र नसलेल्या भागातील आठवी ते दहावीच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्याची अंमलबजावणी काही मोजक्याच शाळांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यात 85 माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मुलांची उपस्थिती होती. या व्यतिरिक्त पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही.
राज्य शासनाने 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात 5 वी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग कोरोनाचे निकष पाळून सुुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून अंमलबजावणीही सुरु झाली आहे. शाळा सुरू करण्यासाठी घ्यावयाची काळजी, आवश्यक तयारी याबाबत सूचनांची यादी शाळांना दिली आहे. स्थानिकपातळीवर आरोग्य सेविकेकडून आलेल्या मुलांची तपासणी करावयाची आहे. शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्याध्यापकांची बैठक घेतली. त्यामध्ये सर्वानी शाळा सुरु करण्यास होकार दर्शविला आहे.
शाळा सुरु करताना लागणारा खर्च करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मदत झालेली नाही. गतवर्षीही हीच परिस्थिती होती; परंतु कालांतराने विद्यार्थी संख्येनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. तोही अपूराच होता. शासनाकडून आवश्यक तयारीसाठी लागणारा निधी न दिल्यामुळे त्या खर्चासाठी खासगी कंपन्यांकडून मिळणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी, लोकसहभागातून निधी गोळा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.









