जिल्ह्यातील 4 हजार 566 बागायतदारांची मँगोनेटवर नोंदणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 4 हजार 566 आंबा बागायतदारांनी निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या मँगोनेट प्रणालीवर नोंद केली आहे. त्यामुळे यंदा निर्यातीत मोठ्याप्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे गतवर्षी कमी निर्यात झाली होती.

राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मँगोनेटचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता. ग्रेपनेटच्या माध्यमातून द्राक्षांची परदेशात निर्यात केली जाते. या धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी ही प्रणाली विकसित केली आहे. सहा वर्षापूर्वी याला सुरवात झाली. बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहेत, त्याची माहिती ऑनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार बागांचे जनत व व्यवस्थापन केले जाते.

2014-15 पासून मँगोनेट सुविधा सुरु झाली. दरवर्षी नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण केले जाते. मँगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील हापूस परदेशात निर्यात होत आहे. युरोप, जपान, अमेरिका येथील व्यावसायिकांनी रत्नागिरीतील काही शेतकर्‍यांच्या थेट बागेत जाऊन पाहणी करुन मागणी केली होती. त्यामुळे येथील बागायतदारांना चांगला दरही मिळाला होता. मँगोनेटअंतर्गत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 4 हजार 566 शेतकर्‍यांनी नोंदणी झाली असून यंदा प्रमाणपत्र नूतनीकरण करणार्‍यांची संख्या 3 हजार 399 आहे. त्यातील 1 हजार 167 बागायतदार नवीन नोंदणी करणारे आहे. बरेचसे निर्यातदार हे थेट बागायदारांच्या बागेत येऊन आंबा खरेदीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे बागायतदारांचा वाहतूक खर्च वाचतो आणि जागेवर पैस मिळतात. याचा फायदा घेण्यासाठी बागायतदारांकडून मँगोनेटवरील नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.