रत्नागिरी:- ग्रामपंचायतीकडून मिळणारी विविध प्रकारची प्रमाणपत्राचे अर्ज, 8 अ उतारा, कराची थकबाकीची माहिती एका क्लीकवर मिळण्यासाठी महा ई-ग्राम अॅप विकसित करण्यात आले आहे. हे अॅप मोबाइलवर डाउनलोड करून त्याद्वारे अर्ज करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्याकडील दिवसेंदिवस कल वाढत आहे. जिल्ह्यातील 39 हजार 463 जणांनी अॅप घेतले आहे.
अत्याधुनिक सेवांच्या वापरावर आजची तरुण पिढीचा सर्वाधिक भर आहे. हे लक्षात घेऊन शासनाकडून नियमित सेवा देण्यासाठी ई सेवांचा वापर करण्यात येत आहेत. यामध्ये पारदर्शकता, सुटसुटीतपणा आणि वेळची बचत करता येते. महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून गावापातळीवर विविध दाखले, सेवा गावपातळीवर देण्यात शासन यशस्वी झाले
आहे.
प्रत्येक ग्रामपंचायती ई-सेवेने जोडल्या गेल्या आहेत. त्यात शासनाने भर टाकली असून, महा ई-ग्रामसेवा अॅप तयार केले आहे. या अॅपमधून मिळकतीचा नमुना नंबर 8 साठी अर्ज करता येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीकडील कराची थकबाकी भरता येईल. ग्रामपंचायतस्तरावरील जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी झालेल्या प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येतील. अॅपवर अर्ज केल्यानंतर अल्पावधीतच संबंधित कागदपत्रे मिळू शकणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाकडून हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. आतापर्यंत 39 हजार 463 जणांनी अॅप घेतले आहे. त्याचा वापरही सुरु केला आहे.