ग्रामपंचायत निवडणूक; 1100 सदस्य देखील बिनविरोध
रत्नागिरी:- ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून चिन्ह वाटप झाल्यानंतर आता प्रचाराला रंगत येऊ लागली आहे. जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीमध्ये 67 सरपंच तर तब्बल 1100 सदस्य हे बिनविरोध निवडले गेले आहेत.
जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांसह 1766 सदस्यपदासाठी निवडणूक घोषित झाली होती. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. हे अर्ज मागे घेण्याची मुदतही संपली आहे. जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे काही ग्रामपंचायतींमध्ये एक-एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. काही ठिकाणी एकहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, परंतु गावात सामोपचाराने झालेल्या बैठकांमधून तोडगा निघाल्याने बिनविरोधच्या दिशेने अनेकांनी पाऊल टाकत, ग्रामपंचायती बिनविरोध करण्यामध्ये मोलाचा सहभाग दिला.
जिल्ह्यात 222 सरपंचपदासाठी छाननी अंती 635 अर्ज वैध ठरले होते. यातील 162जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 67 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. उर्वरीत 155 सरपंचपदासाठी 406 उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी महाविकास आघाडी, बाळासाहेबांची शिवसेना व भाजप असे युती व आघाडी करुन लढत आहेत तर काही ठिकाणी तिघांमध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे. जिल्ह्यात मंडणगड 1, दापोली 9, खेड 2, चिपळूण 13, गुहागर 9, संगमेश्वर 16, रत्नागिरी 6, लांजा 2 व राजापूर 9 सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत.
याच ग्रामपंचायतीमध्ये 1766 सदस्य असून छाननीअंती 2606 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यातील 300जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे तब्बल 1100 सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरीत 666 सदस्यपदांसाठीही 1206 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मंडणगड 33, दापोली 184, खेड 52, चिपळूण 181, गुहागर 115, संगमेश्वर 167, रत्नागिरी 134, लांजा 99 व राजापूर 135 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. प्रचाराला आता जोरात सुरुवात झाली आहे. आमदार, खासदार, मंत्रिही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामस्थ व पदाधिकार्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना करताना दिसत आहेत.