रत्नागिरी:- महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आतापर्यंत 12 हजार 987 शेतकर्यांच्या खात्यात 40 कोटी 29 लाख रुपये जमा झाले आहेत. लाभ मंजूर असलेले 2 हजार 783 शेतकरी अजून लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेती व शेतीशी निगडित कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांचे नुकसान झाल्याने मागील काही वर्षात शेतीशी निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नव्हती. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला होता. त्यामुळे त्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. या शेतकर्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली होती. पण, अशा परिस्थितीत अनेक शेतकर्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती. त्यांना लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्यांना शासनाने 50 हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजनेंतर्गत योजना लागू केली आहे. 2017-18, 2018-19 व 2019-20 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
याची पहिली, दुसरी व तिसरी यादी शासनाने जाहीर केली आहे. त्यात 15 हजार 761 शेतकर्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 22 हजार 804 शेतकर्यांनी प्रोत्साहन लाभासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील जाहीर झालेल्या तीन यादीतील मिळून 15 हजार 761 लाभार्थ्यांची नावे आली आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यास अनुदान थेट खात्यात जमा होते.
आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्या शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण तत्काळ करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केले आहे.