रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या करिअरचा मोठा टप्पा म्हणून पाहिल्या जाणार्या 10 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. यासाठी कोकण बोर्ड सज्ज झाले आहे. जिल्ह्यात 18 हजार 834 विद्यार्थी परिक्षेला बसणार असून, एकूण 73 परीक्षा केंद्र असणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्डाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या संचलनात हयगय केल्यास कडक कारवाईचा इशारा विभागीय मंडळाने क्षेत्रीय यंत्रणांसहित शाळांना दिला आहे. चालू वर्षीच्या बोर्ड परीक्षा कोल्हापूर व कोकण विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मिशन म्हणून हाती घेतल्याचे दिसून येत आहे. विभागीय मंडळाने प्राचार्य डायट, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना, गटशिक्षणाधिकारी, परिरक्षक, केंद्र संचालक आणि माध्यमिक- उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची ऑनलाइन पद्धतीने दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
मागील डिसेंबर पासूनच जिल्हास्तरावर शाळा प्रमुखांच्या बैठका, भौतिक सुविधांची पाहणी, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी कॉपीमुक्तीची शपथ, शाळा स्तरावर पालक बैठकांचे आयोजन, परीक्षेला सामोरे जाताना-विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उद्बोधन कार्यक्रम व व्हिडिओ निर्मिती असे हटके उपक्रम करतानाच राज्य मंडळाच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यात शाळास्तरावर जनजागृती सप्ताह आयोजित केला. क्षेत्रीय यंत्रणांसह शाळा प्रमुखांच्या पाठपुरावा बैठकाही घेतल्या. त्यातच राज्यस्तरावरून मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला या परीक्षांमध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले असल्याने चालू वर्षाच्या बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू आहेत.
कोकण विभागीय मंडळांची पूर्वतयारी आणि जिल्हा प्रशासनाची तितक्याच तोलामोलाची साथ यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या इयत्ता12 वी परीक्षांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 10वीच्या परीक्षा सुद्धा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा, तालुका, परिरक्षण केंद्र, परीक्षा केंद्र व शाळा स्तरावरील नियोजन काटेकोरपणे पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही विभागीय अध्यक्षांनी सांगितले. दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी भरारी पथक व बैठे पथकाचे उत्तम नियोजन केले आहे.