रत्नागिरी:- सेंद्रीय भाज्यांची घरच्याघरी लागवड करून ती नियमित आहारात वापरली जावी, या उद्देशाने पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजनेंतर्गत कृषितंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) विभागाने यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील 17 हजार शेतकर्यांना बियाणे कीट वितरित केले.
आत्मा विभागाकडून रब्बी हंगामामध्ये भाजीपाला लागवडीला चालना देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात बियाण्यांचे वितरण करण्यात आले. या कीटमध्ये भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबीर यांचा समावेश होता. सुमारे 140 ग्रॅमचे हे पाकिट वैयक्तिक शेतकरी आणि महिला बचतगटांना देण्यात आले आहे. यामध्ये एक गुंठा जमिनीवर लागवड होईल, असे नियोजन केले गेले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील 10 शेतकर्यांचा सहभाग होईल,असा विचार यामध्ये केला गेला. यासाठी 16 लाख 91 हजार रुपये खर्च आला आहे. भात कापणी झाल्यानंतर शेतकर्यांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली
आहे. अनेक ठिकाणी भाजी तयार झाली असून लवकरच ती काढली जाईल. यामुळे सुमारे साडेचारशे एकर जमीन लागवडीखाली आली आहे. ही लागवड सेंद्रिय पद्धतीने करण्यावर भर दिला आहे.