जिल्ह्यातील 10 खासगी हॉस्पिटलना कोविड लसीकरणाची परवानगी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 10 खासगी हॉस्पिटलना कोविड लसीकरण केंद्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. यामुळे नागरिकांना कोविड लस सहजतेने उपलब्ध होणार आहे.

खासगी हॉस्पिटलना कोविड लसीकरणाची परवानगी देताना काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लसीकरणासाठी 3 खोल्यांची उपलब्धता व संलग्न सुविधा असाव्यात. लसीकरण कक्षामध्ये लसीकरणाशी संबंधित आवश्यक व्यवस्था, डॉक्टरची उपस्थिती, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय, प्रत्येक लाभार्थ्याची लस दिल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहील. रुग्णालयांनी मान्यताप्राप्त लस निर्मात्यांकडूनच परस्पर लससाठा खरेदी करावयाचा आहे. शासनाकडून लस पुरवठा करता येणार नाही.

जिल्ह्यात मान्यता देण्यात आलेल्या खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये परकार हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, रत्नागिरी, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी, निर्मल बाल रुग्णालय, रत्नागिरी, शिव श्री हॉस्पिटल, रत्नागिरी, चिरायू हॉस्पिटल, रत्नागिरी, शिवतेज शिक्षण संस्था संचालीत योगीता डेंटल महाविद्यालय, खेड, फिनोलेक्स इंडस्ट्रीज असोसिएशन, खेड, यश फाऊंडेशन, रत्नागिरी, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन, खेड, जे.एस. डब्ल्यू.एनर्जी लिमिटेड, जयगड या संस्थांचा समावेश आहे.