रत्नागिरी:- कोरोना बाधितांची संख्या घटल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बहूसंख्य शाळा मंगळवारपासून चालु झाल्या आहेत. पटसंख्या अधिक असलेल्या शहरी भागातील शाळांमध्ये गर्दी टाळण्यासाठी एक दिवस मुले, एक दिवस मुली असे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून पुन्हा सुरू करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते. मंगळवारी (ता. १) सकाळी आणि दुपारच्या सत्रात शाळांमधील किलबिलाट सुरु झाला. ग्रामीण भागातील शाळांचा पट कमी असल्यामुळे अनेकांनी वर्ग चालूच ठेवले होते. जिल्ह्यात २ हजार ५२२ जिल्हा परिषद आणि ४६५ माध्यमिक अशा ३ हजार १०२ शाळा आहेत. त्यापैकी २ हजार ७७५ शाळा चालू करण्यात आल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील दहा शाळा चालू करण्यास तेथील शाळा व्यवस्थापन समितीने नकार दिला होता. त्यामुळे त्या शाळा आजही बंदच होत्या. तर मंडणगड तालुक्यातील २ आश्रमशाळा चालू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यात सव्वा दोन लाख विद्यार्थी असून त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. शहरी भागातील माध्यमिक शाळांचे पट अधिक असल्यामुळे एक दिवसाआड नियोजन केले होते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना तापमानाची तपासणी केली जात होती. सोशल डिस्टन्सिंग, मास्क यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. आजारी मुलांना शाळेत न येण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.