जिल्ह्यातील 15 गावांतील 38 वाड्यांना पाणी टंचाईची झळ

रत्नागिरी:-  जिल्ह्यात रखरखीत उन्हाच्या झळांनी पाणीटंचाईचा दाह दिवसागणिक तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे प्रामुख्याने येथील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तीन तालुक्यांना या टंचाईने ग्रासले आहे. या तीन तालुक्यातील एकूण 15 गावांतील 38 वाडय़ांतील 10 हजार 938 ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी आतापर्यंत 7 टँकरच्या 364 फेऱ्यांनी पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

वाढत्या तापमानाने जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. या टंचाईग्रस्त वाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनस्तरावरून धावपळ सुरू झाली आहे. तेथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी प्रशासनस्तरावरून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईग्रस्त गावातील 10 हजार 938 ग्रामस्थांना केला जाणार 7 टँकरने पाणीपुरवठा पाहता जणू तारेवरची कसरत सुरू आहे.

रत्नागिरीतील 5 गावांतील 25 वाडय़ांना 5 टँकरद्वारे, चिपळूण तालुक्यात 8 गावातील 11 वाड्यांना एक टँकर तर खेडमध्ये 2 गावांतील 2 वाड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा प्रशासनस्तरावरून सुरू करण्यात येत आहे. दिवसागणिक जिल्ह्य़ातील वाढत्या तापमानामुळे पिण्याया पाणीस्त्रोतांच्या पाणी पातळीत झालेली घट पाहता ही पाणी टंचाई उग्ररुप धारण करण्याची चिन्हे उभी ठाकली आहे.