जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 70 टक्के मतदान 

रत्नागिरी:-जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी शांततेत पार पडलेल्या प्रक्रियेत 70 टक्के मतदान झाले. खेड, मंडगणड तालुक्यातील किरकोळ वादा व्यतिरिक्त अन्य कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. तर रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.

गेले महिनाभर रंगलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात 15 टक्केच मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढू लागला. सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत 69 हजार 243 मतदान झाले. 9.30 ते 11.30 वाजेपर्यंतच्या काळात 33.98 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर थोडा ओघ ओसरला. 3.30 वाजेपर्यंत 2 लाख 74 हजार 443 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या कालावधीत 59.78 टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.