रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी परवानाधारक शस्त्रे (पिस्टल, रायफल, बंदूक) जमा करून घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. जिल्ह्यातील ३ हजार १६४ पैकी २ हजार ८९४ शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
मोठे व्यावसायिक, राजकारणी, याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो. जिल्हा प्रशासन व पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत गृह विभागाच्या परवानगीने परवाना दिला जातो. रत्नागिरी जिह्यात ३,१६४ जणांनी शस्त्र परवाने घेतले आहेत. सध्या आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक काळात वाद‚विवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त समितीने पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्त्र जमा करून घेण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणेदारांना दिले आहेत.
आजपर्यंत २ हजार ८९४ जणांनी शस्त्र जमा केले आहेत. बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षक यांची अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार नाहीत. बँकेच्या सुरक्षेसाठी तेथील सुरक्षारकास, एटीएमचे पैसे वाहतूक करणार्या वाहनातील सुरक्षा रक्षकास, स्पोर्ट शस्त्र धारक असलेल्या २३२ परवानाधारकांना मुभा देण्यात आली आहे. विशेष मोहीम राबवून अवैध शस्त्र बाळगणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रत्येक ठाणेदारांना सूचना दिल्या असून, पोलिस अधीक्षक विभाग त्याबाबता दररोज आढावा घेत आहेत. पोलिस ठाण्यात जमा करण्यात येणारी ही अग्निशस्त्रे आचारसंहिता संपल्यानंतर परत देण्यात येणार आहेत.









