रत्नागिरी:- हवामान धोक्यांपासून आंबा व काजूपिकांना संरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील २७९ बागायतदारांनी विमा उतरवला असून, १२३.८६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.७७ टक्केच बागायतदारांनी विमा योजनेला प्रतिसाद दिलेला आहे.
मागील वर्षी उतरवलेल्या विम्याचा परतावा विलंबाने मंजूर झाला असून, ती रक्कम बागायतदारांच्या बँकखात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात बहुसंख्य बागायतदार विमा उतरवतील, अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबवण्यात येते. चालू वर्षी २०२५-२६ मध्ये आंबिया बहारासाठीच्या योजनेतील सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळात आंबा व काजूपिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येते. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेण्यासाठीचे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवसपूर्वी बँकेत देणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी ०.१० हेक्टर ते जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. या योजनेचा विमा संरक्षित कालावधी १ डिसेंबर २०२५ ते १५ मे २०२६ असा आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिकेश शिगवण यांनी सांगितले.
गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार ४५३ बागायतदारांनी विमा उतरवला होता. विमा कंपनीकडून जिल्ह्याला १०० कोटीचा विमा परतावा मंजूर केला असून, त्याची घोषणा आठ दिवसांपूर्वी झाली. सध्या विम्याचे पैसे बँकखात्यात जमा होत आहेत. त्यामुळे बागायतदार विमा उतरवण्यासाठी अखेरच्या टप्प्यात गर्दी करतील, अशी शक्यता आहे. आतापर्यंत ७७ कर्जदार आणि २०२ विनाकर्ज घेतलेल्या बागायतदारांनी विमा उतरवला आहे. सुरवातीच्या टप्प्यात प्रतिसाद कमी मिळत आहे. २७९ बागायतदारांनी आतापर्यंत १५ लाख ३९ हजार रुपये विमा रकमेपोटी भरलेले आहेत.









