Wednesday, September 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार मतदारांची नावे वगळली

जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार मतदारांची नावे वगळली

रत्नागिरी:- जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप यादीतील नाव तपासण्याची जबाबदारी आता मतदारांवर आली असून, नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक धरून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातही सुरु आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, तसेच नाव, पत्ता व अन्य तपशील योग्य आहेत का, याची पडताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीनेही यादी तपासता येणार आहे.

नावे वगळण्यामागे नेमके कारण काय? जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याने त्यामागील कारणांकडे आता लक्ष लागले आहे. मृत मतदार, स्थलांतरित मतदार, दुबार नोंदणी किंवा अन्य कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्याने संबंधित मतदारांना आपले नाव वगळले गेले आहे का, याची खातरजमा करून त्यावर हरकत घेण्याची संधी मिळणार आहे. तीन नमुन्यांतून दावे-हरकती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नावावर आक्षेप घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७, तर मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.

राज्यात १ लाख २१६ केंद्रे

विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचेही सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. पूर्वीची १ लाख २५३ मतदान केंद्रांची संख्या आता १ लाख २१६ झाली आहे. यात ३९४ नवीन मतदान केंद्रांची भर पडली, तर मतदारसंख्या कमी झाल्याने ४३१ केंद्रे कमी करण्यात आली.

राज्यातील २ कोटी जणांचा समावेश

एसआयआर कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची म्हणजे २१.१४ टक्के नावे ही प्रारूप यादीत वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी नोंद झाली आहेत.

४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी

प्रारूप यादीतील २००२-२००४ च्या मतदार यादीशी जुळवणी न झालेले मतदार तसेच तार्किक विसंगती आढळलेले मतदार यांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी करून निर्णय घेतला जाणार आहे.