जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायतींमध्ये होणार ग्रामकृती गटाची स्थापना

रत्नागिरी:- माझी वसुंधरा अभियानात जमिन, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी गावोगावी ग्रामकृती गटाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायती निवडण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचे मूल्यमापन ६ ते ३१ एप्रिलपर्यंत केले जाणार आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतस्तरावर कर्मचार्‍यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत स्तरावर एकत्रीत चर्चा करुन माझी वसुंधरा अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी विविध उपायोजना आखणे, विविध योजनांची अंमलबजावणी, निधीसाठी पाठपुरावा, स्वयंसंस्थांची मदत, विविध मुद्यांची डॉक्युमेंटेशन आदी कार्यवाही करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मूल्यमापनात यशस्वी ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्षेत्रीय मूल्यमापन २ ते २५ मे या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमाफत करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनी निकाल व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. ग्राम कृती गटाने दर सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करावी. पंचतत्वावर आधारीत मूल्यमापन तक्त्यानुसार कामगिरी करण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही ग्रामकृती गट करतील. तालुकास्तरीय नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच क्षेत्रीय संनियंत्रण अधिकार्‍यांशी समन्वय राखून ग्रामपंचायतीमध्ये कामकाज करावे लागणार आहे.