जिल्ह्यातील १०२ कंत्राटी डॉक्टर पगाराविना

रत्नागिरी:- एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सध्या कंत्राटी पद्धतीने नेमलेले बीएएमएस डॉक्टर जीव धोक्यात घालून सांभाळत आहेत. मात्र, गेले पाच महिने पगार न मिळाल्याने जिल्ह्यातील १०२ कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य सरकारने बिघडवले आहे.

​रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २ उपजिल्हा रुग्णालये आहेत. ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा ‘व्हेंटिलेटर’वर गेली होती. ही कोसळणारी यंत्रणा सावरण्यासाठी प्रति महिना ४० हजार रुपये वेतनावर एकूण १०२ बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली. हे कंत्राटी डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रांची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन २४ तास सेवा देत आहेत.
​जुलै २०२५ पासून या कंत्राटी डॉक्टरांना सरकारने पगार दिलेला नाही. पगार वेळेवर न मिळाल्याने आणि सलग पाच महिन्यांचा पगार थकल्यामुळे डॉक्टरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. ​अनेकांचे बँक हप्ते थकले आहेत. ​मुलांच्या शाळेच्या फी भरायच्या राहिल्या आहेत. ​घरातील आई-वडिलांच्या आजाराचा खर्च भागवणे कठीण झाले आहे.
​जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अक्षरशः खांद्यावर घेणाऱ्या डॉक्टरांनाच त्यांच्या हक्काच्या वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

​जुलै महिन्यापासून पगार न मिळाल्याने या डॉक्टरांची गणपती आणि दिवाळी सण कोरडे गेले. नववर्षाच्या तोंडावर तरी थकलेला पगार मिळणार की नाही, असा सवाल या १०२ कंत्राटी डॉक्टरांना पडला आहे. सरकारने तातडीने या डॉक्टरांचे थकीत वेतन अदा करून त्यांचे आर्थिक आरोग्य पूर्ववत करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.