मुंबईत महत्वपूर्ण बैठक; महायुतीवर एकमत
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘महायुती’ करण्याचा अंतिम निर्णय शुक्रवारी मुंबईत घेण्यात आला आहे. महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली असून विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रायगड येथील निवासस्थानी आज रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत जिल्ह्यामध्ये युती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या उच्चस्तरीय महायुतीच्या बैठकीला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्य गृहमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसाठीच्या निवडणूक नियोजन, संघटनाची तयारी आणि रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे, यावर नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.
संघटनेची एकजूट, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेतृत्वाची दिशा, या तिन्हींच्या एकत्रित बळावर रत्नागिरी जिल्ह्यात आगामी निवडणुकीत निश्चितच यशाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास या बैठकीत उपस्थित प्रमुख नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. युतीचा निर्णय झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.









