४ नगपरिषद तर ५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधुम
रत्नागिरी:- जिल्ह्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. जिल्ह्यातील ४ नगपरिषद तर ५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने प्रभागरचना करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांची धामधुम सुरू झाली आहे.
याबाबत आयोगाने वॉर्ड रचना कशी करायची याबाबत अजून डिटेल्स दिलेले नसले तरी येत्या २-३ दिवसात याचाही तपशील मिळू शकणार आहे. राज्यातील डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत ज्यांची मुदत संपत आहे आणि ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायत याना नव्याने मंजुरी दिली आहे अशा सर्व ठिकाणी ही वॉर्ड रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही वॉर्ड रचना आता ऑनलाईन गुगलवरून आयोगाला सादर करायची असून याचे नकाशे देखील द्यावे लागणार आहेत. सर्वसाधारणपणे २०११ च्या जनगणनेनुसार ही वॉर्ड रचना असून यंदा सिंगल वॉर्ड रचना करायची असल्याने नागरसेवकांवरील ताण कमी होऊन प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक वॉर्डातच काम करावे लागणार आहे.
वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यावेळी केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एवढेच आरक्षण राहण्याची शक्यता असून इतर मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रभागाला जादा वॉर्ड उपलब्ध होणार आहेत. हे काम २३ ऑगस्टपासून सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यावर वॉर्ड रचना नागरिकांच्या आक्षेपासाठी प्रसिद्ध केली जाईलरत्नागिरी नगरपरिषदेत वॉर्डरचनेत २ वॉर्ड वाढण्याची शक्यता असून यावेळी अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण असल्याने या जमातीला ३ वॉर्ड मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रत्येक वॉर्डमध्ये अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या किती आहे? यावर वॉर्ड आरक्षित होणार आहेत.ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणा आहे. अनेक वॉर्डमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सर्वच पक्षात होणार आहे.