रत्नागिरी:- आईवडील नाहीत, दुर्धर आजाराने त्रस्त, अपंगत्व असलेले, घरगुती वादातून वेगळे झाले आहेत अशा मुलांसाठी शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन सुधारित योजनेंतर्गत लाभ दिला जातो. जिल्ह्यातील सुमारे १ हजार १४६ मुलांना शासनाने दत्तक घेतले आहे. या मुलांसाठी दरमहा २५ लाख रुपये अनुदान शासनाकडून दिले जात आहे, असे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीकांत हावळे यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन सुधारित योजना जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी हावळे यांच्या नेतृत्वाखाली राबविली जात असून यामध्ये ते १८ वयोगटातील ११४६ मुलांना दर महिना २२५० रुपये दिले जातात. संपूर्ण जिल्ह्यात दर महिना सुमारे २५ लाख रुपये दिले जात असून त्यामध्ये अनाथ बालके, अपंग बालक, दुर्धर आजाराने ग्रस्त बालके, घरगुती वादातून विभक्त झालेली बालके, भीक मागणारी बालके अशा विविध प्रकारच्या बालकांची जबाबदारी शासन घेत असून ० ते १८ वयोगटातील मुलांना याचा लाभ होतो. तरी ज्यांचे पालक नाहीत अशा लहान मुलांच्या नातेवाइकांनी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीकांत हावळे यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









