स्वच्छ भारत अभियान ; 77 गावे ओडीएफ प्लसच्या प्रतिक्षेत
रत्नागिरी:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील 1,455 गावांना ओडीएफ प्लस’ दर्जा प्राप्त झालेला आहे. अजूनही 77 गावे शिल्लक असून, 33.2 टक्के म्हणजेच सुमारे साडेचारशे गावे मॉडेल व्हिलेज म्हणून नोंदली गेली आहेत. ओडीएफ प्लस’ गावांमध्ये एप्रिल, मे या सलग महिन्यात रत्नागिरी जिल्हा देशात दुसर्या क्रमांकावर आहे.
स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत हागणदारीमुक्त करण्याची मोहीम केंद्र सरकारने राबवली होती. यामध्ये सामूहिक वस्तीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी, दैनंदिन साफसफाई, उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणार्यांना प्रतिबंध करणे, कँटोन्मेंट हद्दीतून वाहणार्या नाल्यांच्या बाजूचे सुशोभीकरण व उद्यानांची उभारणी असे विविध उपक्रम राबवले होते. आदी उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीत राबवले आहेत का, याची पाहणी करण्यासाठी केंद्राकडून संस्थेची नेमणूक केली. त्यानंतर केंद्र शासनाने ओडीएफ प्लस’ गावे करण्याची मोहीम हाती घेतली. जिल्ह्यात 1,532 गावे असून, त्यातील 1,455 गावांना ओडीएफ प्लस दर्जा’ मिळाला आहे. जानेवारी 2023 मध्ये रत्नागिरी जिल्हा भारतात सातव्या स्थानावर होता. त्यानंतर जिल्हा परिषद स्वच्छता मिशन विभाग, ग्रामपंचायत विभागाने गावपातळीवर सातत्याने पाठपुरावा करत ओडीएफ प्लस’मधील निकषांच्या पूर्ततेसाठी विशेष नियोजन केले. गावागावांत शौचालये, प्लास्टिक कचरा संकलनावर भर दिला असून, शाळांसह गावात जागृती करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. देशभरात ओडीएफ प्लस’ गावांची दर महिन्याला चाचपणी होते. ओडीएफ प्लस’साठी पात्र ठरलेल्या गावांची माहिती ऑनलाइन भरण्यात येते. त्याची प्रत्यक्ष चाचपणी केल्यानंतर ते गाव ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित करतात. स्वच्छ भारत मिशनमधील सर्व योजना ज्या गावांमध्ये राबविण्यात येतात, त्या गावांची नोंदणी मॉडेल व्हिलेजमध्ये केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांची नोंदणी यामध्ये झाली आहे.









