जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत 5 जूनला राबवणार प्लास्टीक मुक्तीसाठी महाश्रमदान मोहिम

रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत 5 जूनला पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक मुक्तीसाठी महाश्रमदान मोहिम राबविण्यात येणार आहे. या दिवशी गोळा केलेल्या प्लास्टीकचे पुन:चक्रीकरण केले जाणार असून त्यासाठी चिपळूण व रत्नागिरीतील दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ही मोहीम जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाकडून राबवली जाणार आहे.

श्रमदान मोहिमेसाठी यंत्रणा ग्रामपंचायतस्तरावर नियोजन करावयाचे आहे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी संपर्क अधिकाऱ्यांच्या साह्याने ग्रामपंचायत निहाय 22 ते 25 मे या कालावधीत गावातील कचरा साठणारी ठिकाणे निश्चित करून जिल्हा परिषदेच्या ॲपवर जीओ टॅग करावयाची आहेत. तेथे पुन:श्च कचरा जमा होणार नाही याचीही दक्षता त्यांनीच घ्यावयाची आहे. 26 ते 31 मे पर्यंत कार्यक्रमाची माहीती ग्रामपंचायतींना द्यावयाची आहे. व्यापारी, दुकानदारांच्या बैठका घेऊन प्लास्टीक बंदचे आवाहन केले जाईल. आशा व अंगणवाडी सेविका, सामान्य नागरीक, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, नेहरु युवा केंद्र, NCC, NSS चे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पोलीस दल, दवाखाने, शेतकरी संघटना आणि ग्रामपंचायतीमार्फत गावागावात जागृती केली जाईल. 5 जून या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमधुन किमान 12 किलो प्लास्टीक गोळा करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मोहीम राबवल्यानंतर प्लास्टीक कचऱ्याच्या गोणी ग्रामपंचायतीचे नाव व बॅग नंबर लिहून तालुकास्तरावरील संकलन केंद्रावर पाठवायच्या आहेत. ही माहीती ॲपवर नोंदवली जाईल. 6 ते 10 जून या कालावधीत मंडणगड, दापोली, खेड, चिपळुण, गुहागर या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एकत्रित केलेला प्लास्टीक कचरा प्रक्रीयेसाठी वाहून आणला जाईल. या तालुक्यांसाठी चिपळूण खडपोली येथील अमर इंडस्ट्रीजची निवड केला आहे. मयुर महाडिक यांच्याशी संपर्क करून त्या कंपनीत कचरा प्रक्रीयेसाठी दिला जाईल. तर राजापुर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यांसाठी रत्नागिरीतील झाडगाव येथील एम. एस. मलुष्टे कंपनीचे मल्हार मलुष्टे यांची नियुक्ती केली आहे. संकलन आणि कचरा कंपनीपर्यंत नेण्याचे नियोजन पंचायत समितीस्तरावरुन गट विकास अधिकारी यांनी करावयाचे आहे. प्लास्टीकच्या प्रकारानुसार ग्रामपंचायतीला कंपनीकडून किलोनिहाय रक्कम दिली जाणार आहे.