जिल्ह्यातील शेकडो सीआरपी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे

रत्नागिरी:- महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळअंतर्गत काम करणार्‍या सीआरपी यांना उमेदप्रमाणे मासिक मानधन व अन्य सोयी द्याव्यात या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यामध्ये जिल्ह्यातील शेकडो सीआरपी महिला सहभागी झाल्या होत्या.

भारतीय मजदूर संघ संलग्न असलेल्या कंत्राटी कर्मचारी संघाच्यावतीने राज्यभर हे धरणे आंदोलन 30 जुलै रोजी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित करण्यात आले होते. यात शेकडो सीआरपी महिला सहभागी झाल्या होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचार्‍यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चा करीता राज्यासाठी 25 लाख रुपये, सीआरपी म्हणून कार्यरत असणार्‍यांना उमेदच्या सीआरपीप्रमाणे सहा हजाराचे मानधनाची तरतूद करण्यात यावी, माविम स्थापित प्रत्येक गटाला उमेद प्रमाणे तीस हजार रुपये आरएफ फिरता निधी उपलब्ध करुन द्यावा. त्याचप्रमाणे सात टक्के व्याजाने बँक कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा प्रमुरख मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यभर करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. रत्नागिरीमध्ये या महिलांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले.