जिल्ह्यातील शाळा आजपासून पुन्हा गजबजणार

रत्नागिरी:- कोरोना बाधितांची संख्या घटल्यामुळे जिल्हाप्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेल्या शाळा आज मंगळवारपासून (ता. 1) चालू होत आहेत. गेले दोन महिने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास शिकवला जात होता. कोरानातील परिस्थितीचा विचार करुन गर्दी टाळण्यासाठी शाळांनी एक दिवस आड मुलांना शाळेत बोलावण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून पुन्हा सुरू करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात दररोज दोनशेहून अधिक कोरोनाबाधित सापडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून माध्यमिक, प्राथमिक शाळा चालू करण्याबाबत सावध भूमिका घेतली होती. त्यामुळे पहिली ते बारावीच्या सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापनाची प्रतीक्षाच करावी लागती होती. अखेर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितींची बैठक घेऊन शाळा चालू करण्याबाबत मतांची पडताळणी केली. यामध्ये ग्रामीण आणि शहर परिसरातील सर्वच शाळा होत्या. पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी शाळा सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखवला होता. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझिंग या कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच प्रत्यक्ष शाळा चालू करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पहिली ते बारावीचे वर्ग 1 फेब्रुवारी सुरू करावेत, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी काढले आहेत. कोरोनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून घंटा वाजणार आहे.