जिल्ह्यातील रस्ते विकास प्रगती समाधानकारक दिशेने

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते विकास प्रगती समाधानकारक दिशेने आहे. जिल्हा, शहरे, गावे रस्त्यांमुळे एकमेकांजवळ आली की विकास साधला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ग्रामीण आणि इतर रस्ते बनवण्याचे लक्ष्य 8 हजार 438.15 कि.मी. होते. त्यापैकी 6 हजार 775.15 कि.मी.चे लक्ष्य साध्य झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे लक्ष्य 6 हजार 589.72 कि.मी.चे होते. त्यापैकी 5 हजार 607.36 कि.मी.चे लक्ष्य साध्य झाले आहे. इतर रस्त्यांचे लक्ष्य 1 हजार 848.43 कि.मी. इतके होते. त्यापैकी 1167.79 कि.मी. साध्य झाले आहे.
रोड प्लॅन किंवा रस्ता योजना 2001 ते 2021 नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते बनवण्याचे नियोजन केले जाते. एका गावातून दुसर्‍या गावात जाणारा रस्ता किंवा गावे जोडणारा रस्ता हा मानवी प्रगतीचा मार्ग आहे. राज्य, जिल्हे, शहरे, गाव रस्त्यांमुळे एकमेकांना जोडले जावून विकास साधण्यास मदत होते.

दरम्यान सन 2022-23 अखेर जिल्ह्यातील एकूण रस्त्यांची लांबी 10 हजार 601 कि.मी. इतकी होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमधल्या रस्त्यांचाही समावेश आहे. या 10 हजार 601 कि.मी.च्या रस्त्यांमध्ये 8 हजार 454 कि.मी. डांबरी रस्ते असून 1 हजार 377 कि.मी. खडीचे रस्ते आहेत. त्याचबरोबर 770 कि.मी.चे रस्ते इतर माल वापरून बनवण्यात आलेले आहेत.