रत्नागिरी:- ‘असनी’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून त्याचा मासेमारीवर परिणाम झाला आहे. मोजक्याच नौका मासेमारीसाठी जात असल्याने मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो सुरमईसाठी नागरिकांना नऊशे रुपये मोजावे लागत आहेत. वादळाचा परिणाम अजून दोन राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्या किनारपट्टीवर असनी चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे खोल समुद्रातील वातावरण बिघडले असून उंचच उंच लाटा निर्माण होत आहे. परिणामी मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळले आहे. गेले दोन ही परिस्थिती उद्भवलेली आहे. अरबी समुद्रातही त्या वादळाचा प्रभाव जाणवत असून पाण्याला प्रचंड करंट आहे. हवामान विभागाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अनेक मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीला जाणे टाळले. त्यामुळे मिरकरवाडासह छोट्या-मोठ्या बंदरावर मासळीची आवक घटलेली आहे. मिरकरवाडा येथे दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. गेल्या दोन दिवसात मासळीच कमी असल्याने दरही वधारले आहेत. एक किलो सुरमई 600 रुपयांवरुन 900 रुपयांवर गेली आहे. 900 रुपये किलो पापलेट 1200 ते 1500 रुपयांनी मिळत आहे. शंभर रुपयांमध्ये मिळणार्या सहा बांगड्यांना 250 रुपये मोजावे लागत आहे. अन्य प्रकारच्या मासळीचेह दरही वाढले असल्याने खवय्यांमध्ये तिव्र नाराजी आहे. हजारो पर्यटक कोकणात उतरले असून त्यांना भुर्दड बसत आहे. मासळीचे दर वाढल्यामुळे मच्छी थाळीचा दरही वधारलेला असतो. वादळ शमले असले तरीही पावसाळी वातावरण आणखीन दोन दिवस राहील असा अंदाज आहे.
रत्नागिरीत गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. बुधवारी (ता. 11) दुपारी काही भागात हलका पाऊस झाला. परंतु दिवसभर पावसाळी वातावरण होते. किनारपट्टी भागात हलके वारेही वाहत होते. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलेले होते. पावसामध्ये आंबा सापडून नुकसान टाळण्यासाठी काढणीला वेग आला होता. आंबा काढण्याचे नियोजन करताना बागायतदारांना तारेवर कसरत करावी लागत आहे.









