जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय 

रत्नागिरी:-पाणी टंचाई व वाढता उष्मा लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रातच भरवण्याचे निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील २७०० शाळांमध्ये करण्यात येणार आहे. या शाळा सकाळी ७ ते १२.१० या वेळेत भरवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेले दीड वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. दोन महिन्यापूर्वी शाळा पुन्हा झाल्या आहेत. शासनाच्या निर्यणानुसार सोमवार ते शनिवार पूर्णवेळ तासिका घेण्यात येणार होत्या. रविवारच्या शाळांबाबत ऐच्छिक अधिकार मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आले होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयाला विरोध शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच खासगी शैक्षणिक संस्थांनी नापसंती दर्शविली आहे. मूळात जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाईची झळ पोचते. उष्णताही प्रचंड प्रमाणात असते. यामुळे मार्च महिन्यापासून दरवर्षी सकाळच्या सत्रात शाळा भरवल्या जातात. मुलांनाही त्यामुळे त्रास सहन करावा लागत नाही. शासनाने पूर्णवेळ शाळा भरवण्याच्या निर्णयामुळे पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शालेय पोषण आहार ही योजनाही बंद आहे. शासनाने तोंडी आदेश दिले असले तरी ही योजना जिल्ह्यात अद्याप बंदच आहे. उष्णताही दिवसेंदिवस वाढतच निघाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा त्याचा त्रास सहन करावा लागणार होता. सर्व शिक्षक संटघनांनी सकाळ सत्राच्या शाळेला विरोध दर्शवत प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार प्रशासनाने यावर चर्चा करत सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. सोमवार ते शनिवार सकाळी  ७ ते दुपारी १२.१० या वेळेत शाळा भरणार आहेत. तसे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड याच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. मुलांची परीक्षा एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा, असे या आदेशात नमुद केले आहे.