जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेक गावे दत्तक 

रत्नागिरी:- कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर गावपातळीवर नियंत्रण मिळविण्याकरीता ‘ग्राम दत्तक योजना’ सुरु करण्यात आली आहे. स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील राजीवडा व मिरकरवाडा ही गावे तर अप्पर पोलीस अधीक्षकांनी कसोप गाव दत्तक घेतले आहे. 

सध्या कोरोनाचा फैलाव वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव शहरापुरता मर्यादीत राहिलेला नाही. तो आता ग्रामीण भागामध्ये देखील झपाट्याने पसरत आहे. दररोज कोरोना बाधीतांचे उच्चांकी आकडे समोर येत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर गावपातळीवर नियंत्रण मिळविण्याकरीता ‘ग्राम दत्तक योजना’ सुरु करण्यात आली आहे.या मोहिमेची अंमलबजावणी 28 एपिलपासून संपूर्ण जिल्हयात सुरु झाली. ‘ग्राम दत्तक योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक- एक गाव निवडून ग्राम दत्तक योजनेचा प्रारंभ केला आहे.यामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील राजीवडा व मिरकरवाडा ही गावे तर अप्पर पोलीस अधीक्षकांनी कसोप गाव दत्तक घेतले आहे. तसेच पोलीस उपविभाग स्तरावर खेड, चिपळूण, लांजा, रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी देखील एक-एक गाव दत्तक घेतले आहे.

प्रत्येक गावामध्ये 7 कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. लवकरात लवकर निदान करण्याकरीता चाचणी करवून घेणे, गावात उपस्थित प्रत्येक व्यक्तीची एसपीओ पातळी आणि तापमान मोजणे, अस्वाभावीक आढळल्यास ताबडतोब त्या व्यक्तीस होम क्वारंटाईन किंवा रुग्णालयामध्ये उपचाराकरीता पाठविणे, खबरदारीच्या उपाययोजनांबाबत पोलीसांमार्फत गावातील घरोघरी जनजागृती करणे आदी. तसेच दुर्गम भागातील लोकांना आवश्यक सेवा, हेल्पलाईन नंबर आणि कोव्हीड केअर किट प्रदान केल्या जात आहेत, गावांनी इच्छा दर्शविल्यास गावपातळीवर विलगीकरण केंद्र, केअर सेंटर करण्याकरीता आवश्यक मदत पुरविणे, आवश्यक असल्यास जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे, होम क्वॉरंटाईन रुग्णांचा पाठपुरावा याचा समावेश आहे.