जिल्ह्यातील पाच गावांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण 

रत्नागिरी:- राज्य सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५१६ गावातील गावठणांचे भुमी अभिलेख विभागामार्फत ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यातील पाच गावांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे.
 

जिल्ह्यात प्रथमच मंडणगड तालुक्यातील मौजे पालघर , बामणघर , टाकेडे , केळवत , पिंपळोली या पाच गावांमध्ये दि . २३ नोव्हेंबरला ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे . अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे गावांचे गावठाणातील सर्व मिळकत धारकांचे मिळकतीचे मोजमाप व नकाशा तसेच आखीव पत्रिका तयार करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामविकास विभाग , जमाबंदी आयुक्तालय व सर्व्हे ऑफ इंडिया , डेहराडून यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात अत्याधुनिक ड्रोनव्दारे अचुक व जलद गतीने मोजणी काम होणार आहे . ड्रोनव्दारे गावठाण हा प्रकल्प महत्वाकांक्षी व जनताभिमुख प्रकल्प आहे . गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाआधारे सर्व्हेक्षण होऊन , गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे . धारकांना आपले मिळकतींचे सिमा व नेमके क्षेत्र माहित होणार आहे गावठाणातील धारकांना आपले मालमत्तेचे अधिकार अभिलेख पुरावा म्हणजेच मालमत्ता पत्रक ( मिळकत पत्रिका ) मिळणार आहे . मालमत्ता पत्रक म्हणजेच गावठाणातील घर जागेचा मालकी हक्काचा पुरावा असलेने त्याआधारे कर्ज उपलब्ध होऊ शकेल तसेच तारण म्हणून धारकाला जामिनदार म्हणून राहता येईल . शासनाच्या विविध आवास योजनेत मंजुरी शक्य करणे सुकर होणार आहे . मालमत्तेने मालकी हक्कासंबंधी अभिलेख व नकाशे तयार झालेले आर्थिक पत उंचावेल . गावठाणातील जागेचे मालकी व हद्दीसंबंधी वाद , तंटे मिटविणेसाठी गावठाण भूमापन अभिलेख कायदेशीरदृष्ट्या प्रमाणित मानले जातात , त्यामुळे वाद , तंटे संपुष्टात येतील गावठाणातील जमिनीचे खरेदीविक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टाळता येणार आहे . गावठाणातील सार्वजनिक जागा , खुले क्षेत्र , रस्ते , नाले यांचे नकाशे व अभिलेख तयार होणार अस सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होणार आहे . जिल्ह्यामध्ये मंडणगड , खेड , दापोली , चिपळूण , गुहागर , संगमेशर , रत्नागिरी व लांजा या तालुक्यामध्ये एकूण ५१६ गावामध्ये ड्रोनव्दारे गावठाण सर्व्हे करण्यात येणार आहे . प्रयोगित तत्वावर प्रथम मंडणगड तालुक्यातील मौजे पालघर , बामणघर , टाकेडे , केळवत व पिंपळोली या पाच गावामध्ये ड्रोन व्दारे गावठाण सर्व्हे करण्यासाठी ड्रोन उपलब्ध होणार असलेने दि . २२ नोव्हेंबरला चुना मार्किंग करण्यात येणार असून दि . २३ नोव्हेंबरला ड्रोन प्लाईंग करण्यात येणार आहे.