जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ३७ कोटी ४७ लाखांचा निधी

रत्नागिरी:- प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्ह्याला ३७ कोटी ४७ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी १२ कोटी ५३ लाख २६ हजार रुपये यंत्रणांना वितरित केल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजूनही किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी आहे.

कोकणातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जिल्ह्यातील २१ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधीही संबंधित यंत्रणांकडे सुपूर्द केला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर कामांसाठी सुमारे ३३ टक्के निधी पहिल्याच टप्प्यात दिल्यामुळे ही कामे वेगाने पूर्ण करणे शक्य होणार आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने अनेकवेळा कामे रखडतात. जिल्ह्याला प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात साधारणत: जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी या निधीतून कामे करण्यासाठी यंत्रणांना सुमारे दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी उदासीनता झटकून कामाला वेगाने सुरुवात केली, तर पुढचा निधीही वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. यामध्ये गणपतीपुळेत उभारण्यात येणार्‍या भारतातील पहिल्या जेट बोटचा समावेश आहे. या सुविधा उभारल्यानंतर पर्यटकांना लाभ होणार आहे. यासाठी १ कोटी ८० लाखाचा निधी देण्यात आला आहे. येथे समुद्रात फिरण्यासाठी आधुनिक बनावटीची नौकाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे.