भरपाईचे निकष बदलले ; पक्क्या-कच्च्या घरांसाठी दीड लाख
रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुरवातीला 75 कोटी रुपये भरपाईपोटी दिले जाणार आहेत.
नुकसानग्रस्तांना अधिक मदत मिळावी म्हणून राज्यसरकारने नुकसानभरपाईचे निकषच बदलले आहेत. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गवासियांना घसघशीत मदत मिळणार आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेच. तत्पूर्वी रायगडसाठी 100 कोटी, रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.
पक्क्या-कच्च्या घरांच्या नुकसानीसाठी पूर्वी 95 हजार 100 रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती. ती आता 1 लाख 50 हजार इतकी वाढवण्यात आली आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पूर्वी हेक्टरी 18 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली होती. आता ती वाढवून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल. अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी पूर्वी 6 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती. ती आता 15 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
कच्च्या घरांच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी 6 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती. ती आता 15 हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे. नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी 6 हजार रुपये दिले जात असत, आता ही रक्कम वाढवून 15 हजार इतकी करण्यात आली आहे. लहान-मोठी दुकाने, टपरी, व्यवसाय यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल. घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झालेल्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी 2500 रुपये, तर 2500 रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते. आता विशेष बाब म्हणून कपडे व भांडी यासाठी प्रती कुटुंब प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येतील.