रत्नागिरी:- राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील आंतराष्ट्रीय खो-खोपटू आरती अनंत कांबळे, अपेक्षा अनिल सुतार यांना जाहिर झाला. एकाच वेळी जिल्ह्यातील दोन खेळाडूंना पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक, कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासन निर्णयाने मंजुरी देण्यात आली आहे. 2019-20 या वर्षासाठी खो-खोपटू आरती अनंत कांबळे हिची तर 2021-22 या वर्षासाठी अपेक्षा अनिल सुतार हिला पुरस्कार देण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडू रत्नागिरीतील रा.भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थींनी असून यापुर्वी शिर्के प्रशालेच्याच ऐश्वर्या यशवंत सावंत हिलाही खो-खोतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे.
आरती कांबळे हिने इयत्ता सातवीपासून खोखो खेळाला सुरुवात केली. शालेय स्पर्धातून सहभाग नोंदवत तीने तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकदार पद्धतीने खो-खो खेळून जिल्ह्याचे नाव देशभारत पोहचविले आहे. खेळासोबतच एमए झ्ाालेल्या आरतीने आतापर्यंत सुमारे 60 ते 70 विविध स्पर्धांच्या माध्यमातून खोखो खेळात चमकदार कामगिरी केली आहे. तर तब्बल सहा राष्ट्रीय खो-खो स्पर्धांमधून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर 4 फेडरेशन चषक स्पर्धेमध्येही तीने चमकदार कामगिरी केली आहे.
अपेक्षा सुतार हिचेही माध्यमिक शिक्षण रा. भा.शिर्के प्रशालेतूनच पुर्ण झाले आहे.पदविधर असलेल्या अपेक्षा सुतार हिने 4थ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारतीय खो-खो संघात प्रतिनिधित्व केले होते. तर नेपाळ काटमांडू येथे झालेल्या 13 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय संघातून महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. शालेय स्तरापासून सुमारे 50 ते 60 विविध स्पर्धांच्या माध्यमातून अपेक्षाने विविध पारितोषिक पटकाविली आहे. तर नुकताच तिने मानाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकाविला होता. चार राष्ट्रीय खो-खो स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासोबतच अपेक्षाने तीन फेडरेशन चषक स्पर्धेमधून उत्तम खेळ केला होता.
या दोघीना घडविण्यात राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे खूप मोठे योगदान आहे. तसेच त्यांना क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, राज्य संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
लहान पणापासून खेळाची आवड होती. शिर्के प्रशालेत खो-खो खेळण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे अचूक मार्गदर्शन मिळत होते. न चूकता मैदानात सकाळ, संध्याकाळ सराव करणे, खेळासोबतच फिटनेसकडे लक्ष देणे, खेळातील बारकावे, शोधून स्वत: मधे बदल घडवून आणले. त्यातूनच हे यश मिळत गेले. – अपेक्षा सुतार, पुरस्कार प्राप्त खेळाडू
शाळेतून खो-खो स्पर्धा खेळत होते. इयत्ता सातवीमध्ये असताना खेळायला सुरुवात केली. त्यानंतर प्रशिक्षक पंकज चवंडे यांनी घेतलेल्या नियमित सरावामुळे या पुरस्काराला गवसणी घालता आली. -आरती कांबळे, पुरस्कार प्राप्त खेळाडू









