जिल्ह्यातील दहावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

रत्नागिरी:-दहावी बोर्ड परीक्षेबाबत शासनाने निर्णय जाहीर केला. मात्र बारावी बोर्ड परीक्षेबाबत अद्याप शिक्षण मंत्र्यांनी कोणतेच भाष्य केलेले नाही. परीक्षा होणार का नाही हा निर्णय कधी होणार? कोणत्या पध्दतीने होणार? ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत काहीच सूचना मिळत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
 

परीक्षेवर उच्च शिक्षणाचे भवितव्य अवलंबून असल्याने परीक्षेबात शिक्षण विभागाच्या चुप्पीने विद्यार्थी व पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन वर्ग व परीक्षा होत असल्या तरी प्रात्यक्षिक ज्ञानाचा अभाव निर्माण झाला आहे. कोरोनामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी दहावी परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय कागदोपत्री जाहिर केला. मात्र बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताच निर्णय जाहिर झालेला नाही. जिल्ह्यात बारावीचे सुमारे 10 हजार विद्यार्थी असून परीक्षेची तारीख जाहिर होत नसल्याने त्यांच्या जीव टांगणीला लागला आहे.

शिक्षण विभागाच्या वार्षिक नियोजनानुसार इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार होत्या. मात्र जानेवारी महिन्याच्या अखेरीपासूनच कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे बोर्ड परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. मात्र राज्यात कोरोनाचा कहर वाढल्यामुळे पहिली ते 9 वी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करुन एप्रिलमधील दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी जाहिर केला. उच्च शिक्षण व करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावरील परीक्षा रद्द झाल्याने शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी व पालक वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दहावी परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला, तशा प्रकारे बारावी बोर्ड परीक्षेबाबत काहीच सूतोवाच केले जात नाही. परीक्षा होणार आहे की नाही? होणार असेल तर कशी होणार? ऑनलाईन की ऑफलाईन? बहुपर्यायी प्रश्न असतील की नेहमीप्रमाणे सर्वसमावेशक प्रश्न असतील? असे एक ना अनेक प्रश्न विद्याथ्यांना सतावू लागले आहेत.
वर्षभरापासून बारावीचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत. हे विद्यार्थी अकरावीत होते तेव्हा ऐन परीक्षेत शाळा बंद झाल्या काहींचे एक तर काहींचे दोन पेपर घेण्यात आले होते. उर्वरीत परीक्षाच रद्द झाली. मात्र तेव्हा पहिले सत्र, चाचणी परीक्षा व प्रात्यक्षिक चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. त्या आधारे विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन बारावीत प्रवेश मिळाला. अभ्यासही सुरु झाला. पण परीक्षेबाबत वारंवार पडणार्‍या तारीख पे तारीखने हे विद्यार्थी वैतागले आहेत. परीक्षेची तयारी पूर्ण झाली अन् परीक्षा पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु लागले आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भविष्यही टांगणीला लागले आहे. आधीच ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी बारावी बोर्ड परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षण संस्था, विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.