जिल्ह्यातील चार हजार ग्राहकांची महावितरणच्या ‘गो ग्रीन’ सेवेला पसंती

रत्नागिरी:- महावितरणने वीज ग्राहकांना गो ग्रीन सेवेद्वारे  ई- मेलवर  वीज बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 हजार 10 तर सिंधुदुर्गच्या 2 हजार 603 वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी केली आहे.

या सेवेसाठी नोंदणीकृत ग्राहकांना दरमहा छापिल कागदी वीज बिला ऐवजी ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते. शिवाय वीज बिलात 10 रुपयांची सवलतही दिली जाते. पर्यावरण हितार्थ कागद वाचवून झाडे वाचविण्यासाठी वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेची निवड करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवा निवडीसाठी लिंकवर आपल्या वीज ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट आधारे  ई-मेल पत्ता व छापिल वीज बिलावर डाव्या कोपर्‍यात चौकटीत दिलेला 15 अंकी बिल नं/गो ग्रीन क्रमांक (ॠॠछ) नोंदवून सेवेची निवड करावी. त्यानंतर गो ग्रीन सेवा नोंदणी पूर्ण करण्यासाठी आपल्या ई- मेल पत्त्यावर आलेल्या लिंकवर क्लिक करा. आपले वीज बिल स्पॅम फोल्डर मध्ये जाऊ नये यासाठी महावितरणचा ई- मेल पत्ता आपल्या ई- मेल वरील पत्त्यात नोंद करून घेणे आवश्यक आहे.

गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून, संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे होणार आहे. हा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी कागद विरहित गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले
आहे.