जिल्ह्यातील चार पालिकांचा प्रभाररचना कार्यक्रम रद्द

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; निवडणुका लांबणीवर, पुढील आदेशाची वाट

रत्नागिरी:-जिल्ह्यातील चारही पालिकेच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम शासनाच्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाने पालिकांना दिले आहे. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि खेड पालिकेचा समावेश आहे. प्रभागरचनेबाबत शासनाची कार्यवाही यापुढील अधिनियमातील सुधारित तरतुदीनुसार शासनाचे आदेश झाल्यानंतर स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून त्या पावसाळ्यानंतर होणार, हे आता निश्चित झाले आहे.

जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड पालिकांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना कार्यक्रम २०२२ ला जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रारूप प्रभागरचना, नकाशे, अधिसूचना कलम १० नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागवण्यात कार्यक्रम सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रारूप प्रभागरचना कार्यक्रमाप्रमाणे पालिकाक्षेत्रांची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्याच्या हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करून ती पूर्ण केली. ती प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे. पालिकेच्या प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्याच्या हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया सुधारित अधिनियमाच्या तरतुदीनुसार नव्याने करण्यात येणार आहे.

प्रभागरचना आता राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाने करायची आहे. त्यामुळे आयोगाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या प्रभागरचनेची पुढील कार्यवाही यापुढे अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या आदेशाने करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने पालिकांना कळवले आहे. त्यामुळे शासनाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत जिल्ह्यातील चारही पालिकांच्या प्रभागरचना रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. १८ ते २२ मार्चपर्यंत प्रभागरचनेबाबत हरकती मागवण्यात आल्या होत्या. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तत्काल प्रभागरचना रद्द करण्यात आल्याचा आदेश जारी केला आहे.