रत्नागिरी:- ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्यात येत आहेत. आतापर्यंत 236 उपकेंद्रात अधिकारी नेमले आहेत. लवकरच 111 जणांची नव्याने नियुक्ती केली जाणार असून त्यांना सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी कृष्णा हॉस्पीटल आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
आधुनिक उपचार पद्धतीला पर्याय म्हणून केंद्र सरकारने आयुर्वेद आणि युनानी चिकित्सा पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना केली. त्यानुसार, या पॅथीमधील पदवीधर चिकित्सकांना सरकारी नोकरीतही सामावून घेतले जाणार आहे. दुर्गम भागातील उपकेंद्र स्तरावरील दवाखान्यात आयुर्वेद, युनानी डॉक्टर रुग्णांवर उपचारांसाठी नेमण्यास सुरवात झाली आहे. आरोग्यवर्धीनी उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील उपकेंद्रांमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यात समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या निवासासाठीही व्यवस्था केली गेली आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा हाकण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी नेमले जात आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३७८ पैकी ३५२ उपकेंद्रांमध्ये समुदाय अधिकारी नेमण्याची परवानगी मिळाली होती. त्यानुसार 236 जणांची नियुक्ती केली गेली. दुसर्या टप्प्यात 111 जणांना नियुक्त्या दिल्या आहेत.
ही निवड राज्यस्तरावरुन करण्यात आली आहे. यामध्ये बीएसस्सी नर्सिंग, बीएएमएस, बीएमएस झालेल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. उपकेंद्रात नेमणुकीपुर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. निवडलेल्या उमेदवारांपैकी 51 जणांची टिम कृष्णा हॉस्पीटलला तर 60 जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नियुक्त केले जाईल. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आयुष विभागाकडून परिक्षा घेतली जाते. ती पास झाल्यानंतर नियुक्ती देण्यात येते. उपकेंद्रात नियुक्त केलेेले समुदाय आरोग्य अधिकारी दुपारपर्यंत ओपीडीमध्ये रुग्णांना सेवा देतील. दुपारनंतर उपकेंद्रात येणार्या परिसरात रुग्णांना भेटी देण्यासाठी दौरे करतील. त्यांना महिन्याला 25 हजार रुपये मानधन आहे. त्यांच्या कामातील तत्परता पाहून पंधरा हजार रुपये इन्सेटींव्ह म्हणूनही दिले जातात.
नियुक्तीनंतर तिन वर्ष जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठीचे प्रतिज्ञापत्र आरोग्य विभागाकडून लिहनू घेतले जाते.









