जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये 11 जुलैपासून आर्थिक समावेशन योजना शिबीर

रत्नागिरी:- भारत सरकार वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबाबत शासन योजनांचा लाभ पोहचावा, या उद्देशाने 3 महिन्याच्या कालावधीत आर्थिक समावेशन योजनेच्या शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जुलै ते 26 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी दिली.

    केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल पेन्शन योजना अंतर्गत नोंदणी तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँक खाती उघडणे व बँक खाती असलेल्या लाभार्थ्यांची रि-केवायसी करणे आदी उपक्रम याशिबीरांमार्फत ग्रामपंचायतीमध्ये राबविले जाणार आहेत. 10 वर्षातून एकदा रि-केवायसी करावी लागते. जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात 11, 18 व  25  तारखेला, ऑगस्ट महिन्यात 1, 8, 22,29 आणि सप्टेंबर महिन्यात 12, 19 व 26 तारखेला ही शिबिरे ग्रामपंचायतींमध्ये होणार आहेत. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, त्यासाठी लाभार्थ्यांनी या शिबीरांचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.