एमआयडीसीमार्फत होणार काँक्रीटीकरण व अन्य कामे
रत्नागिरी:- जिल्ह्यातील रखडलेल्या एसटी बसस्थानकांसह अन्य बसस्थानकांचे काँक्रीटीकरणाचे काम एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असून यासाठी 71 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
जिल्ह्यातील रत्नागिरी बसस्थानक, लांजा, चिपळूण येथील बसस्थानकांची कामे निधी अभावी गेल्या काही वर्षापासून रखडली असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधुन नाराजीचे सूर उमटत आहेत. जिल्ह्यातील एसटी स्थानकांचा कायापालट करताना आतील काँक्रीटीकरणाचे काम प्रशासनाने मंजुर केले असून ते एमआयडीसीच्या माध्यमातून आता केले जाणार आहे.
याबाबत माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरीतील अर्धवट राहिलेल्या बसस्थानकासह पाली बसस्थानक, रत्नागिरी विभागीय कार्यालयाचे काँक्रीटीकरणासाठी 5 कोटी रुपये, विरंगुळा विश्रांतीगृहासाठी 1 कोटी, कर्मचारी निवासस्थानांसाठी 4 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. रहाटाघरसाठी 3 कोटी, पावस बसस्थानकासाठी 2 कोटी, संगमेश्वर 4 कोटी, माखजन 1 कोटी 14 लाख, साखरपा 1 कोटी 48 लाख, लांजा 1 कोटी 51, दापोली 2 कोटी 45 लाख, गुहागर 2 कोटी 54 लाख, चिपळूण 3 कोटी, गणपतीपुळे येथील बसस्थानकासाठी 55 लाख, जाकादेवी येथील बसथांब्यासाठी 15 तर खंडाळा येथील बसथांब्यासाठी 15 लाखाचा निधी देण्यात येणार आहे. रत्नागिरी येथील टिआरपी प्लॅन्टसाठी 2 कोटी, कार्यशाळेसाठी 10 कोटी, रत्नागिरी आगारासाठी 3 कोटी, राजापूरसाठी 2 कोटी 84 लाख तर रत्नागिरीतील अधिकारी वसाहतीसाठी 1 कोटीचा असा 71 कोटीचा निधी मंजूर असून या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.









