जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक महिला बेमुदत संपावर

रत्नागिरी:- दरमहा किमान वेतन, ऑनलाइन कामाची सक्ती नको, दिवाळी व भाऊबीज भेटीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बेमुदत संपाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शंकर पूजारी यांनी सांगितले. या संपामुळे शासकिय योजनांच्या अंमलबजावणीचा वेग कमी होणार आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा राज्यस्तरावर आजपासून संप सुरू झाला आहे. आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन, गटप्रवर्तक महिलांना दरमहा 8 हजार 450 रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता, ऑनलाइन कामाची सक्ती करणे बंद करा, दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान पाच हजार रुपये दिवाळी भाऊबीज द्या अशा महत्वाच्या मागण्या संघटनेने शासनापूढे ठेवलेल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अधिकाऱ्यांना संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार आजपासून सुरु झालेल्या संपात जिल्ह्यातील सुमारे १४०० हून अधिक आशा, गटप्रवर्तकांनी सहभाग नोंदवला आहे. संपाच्या कालावधीत कोणत्याही आशा व गटप्रवर्तक महिलेला त्रास देऊ नये, अन्यथा महिला ते सहन करणार नाहीत असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चौदाशेपैकी बहूसंख्य आशा, गटप्रवर्तक संपात सहभागी झाल्या आहेत. संपामध्ये सर्व महिला सहभागी झाल्यामुळे गावागावामध्ये आरोग्य विभागाच्या योजना राबवण्यात अडचणी निर्माण होणार आहे.