रत्नागिरी:- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत उल्लेखनीय काम करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायती ‘ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित करण्यात आल्याचे जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. मरभळ यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. जिल्हयात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरु आहे. मार्च 2021 च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता, वैयक्तिक शौचालय बांधकाम आणि नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, गावाची दृष्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणे व शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीजवळील शौचालये, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन, माहिती शिक्षण व संवाद चित्रमय संदेश या निकषाची पूर्तता करुन ग्रामपंचायती ओडीएफ प्लस केल्या आहेत. त्यात सोवेली (मंडणगड), देहेण, तुरवडे, चिखलगांव (दापोली), भिलारेआयनी (खेड), मोरवणे खुर्द (चिपळूण), अंजनवेल, काताळवाडी तफ अंजनवेल (गुहागर), ठिकाण चक्रदेव, मेर्वी (रत्नागिरी), सांगवे (संगमेश्वर) यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत हागणदारीमुक्त अधिक या निकषांची उत्स्फुर्तपणे पूर्तता करुन स्वच्छता शाश्वत ठेवावी असे आवाहन श्री. मरभळ यांनी केले आहे.