रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील तीन दिवस पाऊस झोडपून काढत आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील आठ पैकी सहा नद्या या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. यामध्ये खेड तालुक्यातील जगबुडी, चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री, लांजा तालुक्यातील काजळी आणि कोदवली आणि संगमेश्वर तालुक्यातील बावनदीने इशारा पातळी ओलांडली होती.
सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः०० मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३२.९५ मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ वा पासून आतापर्यंत २०५ मिमी पाऊस पडलेला आहे. सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९ः५० वा भरती आहे. पुढील ३ तास महत्त्वाचे आहेत. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व एनडीआरएफ यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
सर्व सूचना नागरिकांना दिलेल्या आहेत.









