जिल्ह्यातील आंबा बागायतदार धरणे आंदोलनावर ठाम

रत्नागिरी:- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी 2014-15 साली काढलेल्या कर्जातील 6 टक्के व्याजदार माफ करण्याच्या मागणीसाठी चालू हिवाळी अधिवेशनात तरी शासन दखल घेईल अशी आशा होती. पण कुणीही लोकप्रतिनिधींने या पश्नी आवाज उठवलेला नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री उदय सामंत यांनाही निवेदन देउनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे रत्नागिरीत कोकण आंबा उत्पादक व शेतकरी येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केलेला आहे.

त्याविषयी रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रशासनाला उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांना संघटनेच्यावतीने निवेदनही देण्यात आले आहे. सन 2015 पासून कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिकूल, खराब हवामान, अवेळी पाउस पडणे, वादळी वारे, कोरोनासंकट या कारणांमुळे मोठा आर्थिक फटका बसतआहे. यावर्षी सुध्दा वातावरणातील सतत होणार्‍या बदलामुळे व सतत पडणार्‍या पावसामुळे मोहोर अत्पल्प प्रमाणात आला आहे. आणि मोहोर येण्याचा कालावधीही संपत आलेला आहे. नंतर मोहोर आला तर होणाऱया आंब्याला काडीमोड भाव मिळतो. थरी आंब्याला योग्य भाव (हमीभाव) सुनिश्चित करावा अशी मागणी आहे.

याबाबतची निवेदने शासनाला, स्थानिक मंत्री, आमदारांना वेळोवेळी सादर करण्यात आलेली आहेत. आज देशाला परकीय चलन मिळवून देणारा जगाचा पोशिंदा शेतकरी व बागायतदार यांचे गंभीर, संवेदनशील, ज्वलंत प्रश्न कुणीही गंभीरतेने दखल घेत नाहीत. त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाला जागा यावी, यासाठी 30 डिसेंबर रोजी रत्नागिरीत एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. पण त्या आंदोलनाची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून सुध्दा दखल घेतली जात नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

त्यामुळे शासनाचे खास करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी सकाळी 11 वाजता ठराविक बागायतदार व कोकणातील शेतकरी जमणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने पुढाकार घेवून शासनासोबत विशेष बैठक घ्यावी. आंबा बागायतदारांची थकीत कर्जदारांची सरसकट मुक्तता करावी अशी मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विकेत संस्थेचे प्रकाश साळवी, प्रदीप सावंत यांनी मागणी केली आहे.