जिल्ह्यातील अंगणवाड्या दोन वर्षांपासून बालकांविना

रत्नागिरी:- तब्बल दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे अंगणवाडीत बालके फिरकलेली नाहीत. त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा बोर्‍या उडाला असून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अंगणवाडी शिक्षण हे ‘रामभरोसे’च बनले आहे.

घरी जाऊन शन्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार (टीएचआर) देणे, वजन घेणे, गृहभेटी, कोरोना सर्व्हे, लिंक भरणे, हजेरी रजिस्टर सोडून अन्य रजिस्टर भरणे, सीबीई महिन्यातून दोन वेळा घेणे असे शिक्षण सोडून अन्य कामे सेविकांना करावी लागत असल्याने पूर्व प्राथमिक शिक्षणाचा मूळ हेतूच बाजुला पडला आहे. एवढेच काय पण 3 ते 6 वयोगटातील खासगी शाळेतील बालकांनाही अंगणवाडीच्या पटावर घेऊन त्यांना टीएचआर देण्यात येत आहे. तो अखेर सुरू आहे.

बालकांना पोषण आहाराबरोबर पूर्वप्राथमिक शिक्षण अंगणवाड्यांमध्ये मिळावे, या हेतूने शासन पातळीवर अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. यासाठी सेविकांना वेळोवळी प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
मार्च 2019 पासून कोरोनाचे संकट ओढवले आणि अंगणवाड्या बंद झाल्या. तेव्हापासून बालकांचे कुपोषण होऊ नये, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार मिळावा यासाठी त्यांना घरपोच सुका आहार (टीएचआर) देण्यात येत आहे.

सध्या अंगणवाड्या सुरू आहेत पण बालकेच नाहीत. तरीही सेविका व मदतनिस यांना 10 ते 2 पर्यंत अंगणवाडीत जाऊन बसावे लागत आहे.
पर्यवेक्षिकांना तर काहीच काम उरलेले नाही. भागात भेटी द्याव्यात तर अंगणवाडीत बालके नाहीत. त्यामुळे टीएचआर व अन्य बाबी कागदोपत्री तपासणे एवढ्याच कामात त्या दिवस ढकलत आहेत.

कोरोना काळात बालकांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे लिंक पाठवून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मोबाईल शिक्षणही बंद
पडले आहे. त्यात महिला बालकल्याण विभागामार्फत अंगणवाड्यांना 27 मे 2019 मध्ये देण्यात आलेले मोबाईल हलक्या प्रतिचे व कमी रॅमचे असल्याने ते जाम झाले असून अनेक अंगणवाडी ताईंनी ते मोबाईल शासनास परत केले आहेत. राज्यात जवळपास एक लाख मोबाईल परत करण्यात आल्याची माहिती आहे.
त्यामुळे अंगणवाडीतील बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाला खो बसला असून त्यांचे लेखन -वाचन ठप्प आहे. अंगणवाडीतील बालकांना किमान अक्षर ओळख होणे अपेक्षित आहे, पण दोन वर्षांपासून
अंगणवाड्या बंद असल्याने पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पुरता बोर्‍या उडाला आहे. अंगणवाड्या सुरू करण्याबाबत प्रशासन स्तरावर प्रचंड उदासीनता दिसून येत आहे.

अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामांव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे त्यांना करावी लागत आहेत. अनेक सर्व्हेक्षणांची त्यांच्यावर जबाबदारी असते. कोरोनाकाळात तर त्यांच्यावर आरोग्य तपासणीचीसुद्धा जबाबदारी देण्यात आली होती. त्या मानाने पगार मात्र एकदम अल्प आहे. तोही वेळेत मिळत नाही. शासनाने जाहीर केलेली भाऊबीज भेट अजूनही त्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही.